शिवजयंतीला कणकवलीत मराठा समाजासाठी भव्य सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा | ‘दिलेला शब्द पूर्ण करायचाच’ | खासदार नारायण राणे यांच्या शिकवणीतून निर्णय
Edited by: संदीप देसाई
Published on: February 16, 2026 20:00 PM
views 28  views

कणकवली : कणकवलीकरांवरील प्रेम हे राजकारणाच्या पलीकडचे असल्याचे सांगत येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने कणकवलीत मराठा समाजासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन व अद्ययावत नाट्यगृह उभारण्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. राज्य शासनाच्या जागेवर या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार असून त्यासाठी जागेसह भवन उभारणीकरिता आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “खासदार नारायण राणे साहेबांची आम्हाला नेहमी शिकवण असते की दिलेला शब्द पूर्ण करायचाच असतो. तो शब्द पूर्ण करताना मनस्वी समाधान मिळते,” असे पालकमंत्री राणे यांनी नमूद केले.

कणकवलीकरांची आणि मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी म्हणजे शहरात स्वतंत्र व सुसज्ज नाट्यगृह आणि समाजासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन असावे, अशी होती. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधताना ही मागणी सातत्याने पुढे येत होती. त्यावेळी दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरवत असल्याचे राणे यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यापलीकडे जाऊन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देऊ; परंतु कणकवलीला दर्जेदार आणि नियोजनबद्ध नाट्यगृह व सांस्कृतिक भवन देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येणाऱ्या शिवजयंतीदिनी मराठा समाजाला विश्वासात घेऊन आणि कणकवलीकरांच्या आशीर्वादाने या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याची अधिकृत घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या या वास्तूकडे सर्वांचे लक्ष लागले आहे