स्टुडंट कट्ट्यावर जिल्हाधिकाऱ्यांची खास मुलाखत

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 16, 2026 18:51 PM
views 74  views

सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जिज्ञासा आणि समाजाबद्दलची जाण निर्माण व्हावी या उद्देशाने चौकुळ नं. ४ मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट कट्टा’ या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत घेतली. लहान वयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध कुतूहलपूर्ण प्रश्नांना जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत साध्या, सुटसुटीत आणि बालमैत्रीपूर्ण शब्दांत उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ नं. 4 चे उपक्रमशील शिक्षक जावेद तांबोळी यांनी शाळेमध्ये स्टुडन्ट कट्टा हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत विविध मान्यवरांच्या मुलाखती या कट्ट्यावर घेण्यात येतात. यावेळी स्टुडंट कट्ट्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.  “जिल्हाधिकारी काय काम करतात?”, “कार्यालयात रोज कोणते निर्णय घेतले जातात?”, “आपण मोठे झाल्यावर प्रशासनात कसे काम करू शकतो?” जिल्हाधिकारी होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते? असे प्रश्न केले. तर जिल्हाधिकारी यांनी या बालचमुना समजेल अशा सोप्या शब्दात या प्रश्नांची उत्तरे दिली.  जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देत शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

‘स्टुडंट कट्टा’ हा उपक्रम शाळेचे शिक्षक जावेद तांबोळी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आला असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचेही अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये संवाद कौशल्य, विचार करण्याची क्षमता आणि समाजाविषयी जागरूकता वाढते, असे त्यांनी नमूद केले.

मुलाखतीनंतर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाची सविस्तर पाहणी करून देण्यात आली. विविध विभागांचे कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, विकासकामांची प्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेली आधुनिक AI लॅब विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक प्रभावी कसे होते याची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रश्न विचारत आत्मविश्वासाने संवाद साधला. प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त झाली. ‘स्टुडंट कट्टा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी भेट घडवून देत शिक्षणाला वास्तव जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न असून प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण हे महत्वाचे असल्याचे शिक्षक तांबोळी यांनी सांगितले.