
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे नूतनीकरण चुकीच्या पद्धतीने झाले असून यामुळे नाट्य प्रयोगांसाठी हे सभागृह आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याची तक्रार नाट्य संयोजकांनी केली आहे. या संदर्भात संयोजकांनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
संजय चिटणीस (सावंतवाडी), नागेश नेमळेकर (कुडाळ), गिरीश महाजन (कोल्हापूर) आणि विकास पावसकर (मुंबई) या नाट्य संयोजकांनी हे निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, नूतनीकरण करताना सभागृहात खुर्च्यांची संख्या कमी ठेवण्यात आली आहे. स्टेजच्या समोर मोठ्या प्रमाणात मोकळी जागा सोडण्यात आली असून तिथे अतिरिक्त १२० ते १५० खुर्च्या बसवणे शक्य आहे. सध्याच्या कमी आसनक्षमतेमुळे नाटकाचा खर्च निघणे कठीण होत असून आयोजकांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. नाईलाजास्तव मोकळ्या जागेत प्लास्टिकच्या खुर्च्या लावून प्रेक्षकांना बसवावे लागते. तसेच, सध्या असलेल्या खुर्च्यांपैकी १२ ते १५ खुर्च्या मोडलेल्या असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.
याशिवाय, नूतनीकरणापूर्वी मेकअप रूममध्ये असलेल्या खुर्च्या, टेबल आणि आरसे यांसारख्या सुविधा आता काढून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे बाहेरून येणाऱ्या नामवंत कलाकारांची मोठी गैरसोय होत आहे. मेकअप रूममध्ये साधे टेबल किंवा बसण्यासाठी खुर्ची नसल्याने कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत. सभागृहातील या सर्व त्रुटींची आणि गैरसोयींची नगरपरिषद प्रशासनाने गंभीर दखल घेऊन, स्टेजसमोरील भागात कायमस्वरूपी खुर्च्या बसवाव्यात आणि मेकअप रूममधील सुविधा त्वरित पूर्ववत कराव्यात, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.










