आंजिवडे - पाटगाव घाट मार्गासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 16, 2026 15:55 PM
views 21  views

कुडाळ : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सर्वात कमी अंतराने जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित आंजिवडे - पाटगाव घाट मार्गासाठी आता सर्वांनी एकत्रितपणे मिशन मोडमध्ये काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून समन्वयातून काम करा; जनमताशिवाय विकास होत नाही. या घाटासाठी बेरजेचे राजकारण करूया,” असे ठाम मत मान्यवरांनी व्यक्त केले. येत्या अधिवेशनापूर्वी पुढील रणनिती ठरविण्यासाठी कृती समितीची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे-खिरमळावाडी (ता. कुडाळ) येथे बाळ केसरकर यांच्या फार्महाऊसवर शनिवारी सायंकाळी माजी जि.प. बांधकाम सभापती सगुण धुरी यांच्या अध्यक्षतेखाली आंजिवडे घाट कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीस इस्कॉनचे प्रवर्तक डॉ. विश्वनाथ सावंत, जि.प. सदस्य दिपक नारकर, रुपेश कानडे, सेवानिवृत्त उपअभियंता आर. के. देसाई (कोल्हापूर), ठेकेदार प्रभाकर परब, माजी सभापती मोहन सावंत, माजी उपसभापती आर. के. सावंत, साईनाथ नार्वेकर, अजित परब, आनंद मेस्त्री, राजू कविटकर, एस. पी. कोराणे, विजय सावंत, किरण गावडे, प्रमोद म्हाडगुत, सतिश कविटकर, भिवा सावंत, राजा धुरी, सुधीर गुंजाळ, प्रविण सावंत आदी उपस्थित होते.

गेल्या वीस वर्षांपासून भुदरगड (जि. कोल्हापूर) आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे (जि. सिंधुदुर्ग) येथील नागरिक आंजिवडे-पाटगाव दरम्यानचा भैरीची पाणंद घाट मार्ग सुरू करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात या घाटाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले होते. सर्वेक्षणासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. मात्र, घाट रस्त्याच्या दर्जोन्नती प्रस्तावाची फाईल रत्नागिरी येथील अधिक्षक कार्यालयात प्रलंबित असल्याने ती तातडीने पुढे सरकविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी सगुण धुरी यांनी आंजिवडे घाटासाठी सर्वांनी एकजूट दाखवणे ही काळाची गरज आहे. सध्या सर्व सत्ताकेंद्र महायुतीकडे असल्याने अडचणी निर्माण होणार नाहीत, असे स्पष्ट केले. डॉ. विश्वनाथ सावंत यांनी जनमत तयार केल्याशिवाय सार्वजनिक कामे पूर्ण होत नाहीत. या घाटामुळे स्थलांतर थांबेल. पुढील दोन-तीन वर्षांत घाट मार्ग सुरू करण्याचे नियोजन करावे; आमच्या एनजीओचा पूर्ण पाठिंबा राहील,अशी ग्वाही दिली. सेवानिवृत्त उपअभियंता आर. के. देसाई यांनी घाटाची लांबी सुमारे सात किलोमीटर असल्याचे सांगत दोन्ही जिल्ह्यांतून समन्वय आवश्यक असल्याचे नमूद केले. जि.प. सदस्य दिपक नारकर यांनी आंजिवडे घाट आणि सह्याद्री मार्ग पूर्ण झाल्यास या भागाचा विकास झपाट्याने होईल. नागपूर अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा प्रश्न मांडण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी सहकार्य राहील,असे सांगितले.रुपेश कानडे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोहन सावंत यांनी घाट रस्त्याच्या कामात राजकारण न आणण्याचे आवाहन करत वनविभागाच्या अडचणींचाही उल्लेख केला. या बैठकीत डॉ. विश्वनाथ सावंत, दिपक नारकर, रुपेश कानडे व सगुण धुरी यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित परब यांनी केले. निवेदन शंकर कोराणे यांनी सादर केले व शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांनी बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.