
कुडाळ : मालवण शहरी भागातील मच्छीमार बांधवांनी आपल्या व्यवसायासाठी उभारलेल्या कच्च्या बांधकामांना प्रशासनाकडून हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या कारवाईमुळे मच्छीमार बांधवांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या प्रकरणी आमदार निलेश राणे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत प्रशासनाला मच्छीमारांची बाजू मांडण्यास भाग पाडले, ज्यामुळे सध्या ही कारवाई थांबली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील मच्छीमारांना दिलासा दिला आहे. मालवण किनारपट्टीवरील शहरी भागात अनेक मच्छीमारांनी मासळी सुकवण्यासाठी किंवा मासेमारी साहित्यासाठी कच्ची शेड/बांधकामे केली आहेत. प्रशासनाने ही बांधकामे अनधिकृत ठरवत ती हटवण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या होत्या. या संकटामुळे मच्छीमार हवालदिल झाले होते.
मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष विकी तोरसकर यांनी या गंभीर समस्येकडे आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निलेश राणे यांनी तातडीने कुडाळ प्रांत कार्यालयात भेट घेतली. यावेळी मच्छीमार प्रतिनिधींनी प्रांताधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली: ही बांधकामे केवळ मासेमारी व्यवसायाला आधार देण्यासाठी आहेत, व्यावसायिक नफ्यासाठी नाहीत. आमदार राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर, प्रशासनाकडून तूर्तास कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले.
"आमदार निलेश राणे यांनी या विषयात तत्काळ दखल घेतली आणि आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे." — विकी तोरसकर, अध्यक्ष, मच्छीमार संघटना.
प्रशासनाच्या संभाव्य कारवाई होणार नाही असे आश्वासन मिळाल्याने मालवणच्या मच्छीमार व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. संकटसमयी धावून आल्याबद्दल मच्छीमार बांधवांनी आमदार निलेश राणे यांचे जाहीर आभार मानले आहेत. यावेळी दत्ता सामंत, काका कुडाळकर, संजय पडते, विकी तोरस्कर, दादा साईल, मच्छीमार बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.










