
सावंतवाडी : गोविंद चित्र मंदिर ते भटवाडी या मुख्य रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर, भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक बबन डिसोझा यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेला जाग आली असून हे धोकादायक खड्डे डांबर - खडीने बुजवण्यात आले आहेत.
या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनेक छोटे - मोठे अपघातही या ठिकाणी घडले होते. ही बाब गांभीर्याने घेत बबन डिसोझा यांनी नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने रस्त्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले. श्री. डिसोझा यांचे सामाजिक क्षेत्रात नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. केवळ रस्तेच नव्हे, तर प्रभागातील इतर नागरी समस्या सोडवण्यातही ते अग्रेसर असतात. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक जाणीवेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.










