
कुडाळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम शांत होत नाहीत, तोच कुडाळमध्ये आता राजकीय चुरस बॅनरबाजीपर्यंत पोहोचली आहे. पावशी मतदारसंघातून शिंदे सेनेचे दादा साईल विजयी झाल्यानंतर, हूमरमळा येथे लावण्यात आलेल्या 'किंगमेकर' बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी काळात कुडाळमध्ये मोठे 'बॅनर वॉर' पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
पावशी मतदारसंघात दादा साईल यांच्या विजयानंतर, 'किंगमेकर' दया अणावकर मित्रमंडळ यांच्या वतीने एक बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर "बरे बरे... गार केले... गंमत मधी चल" अशा आशयाचा खोचक मजकूर लिहून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्या कामाच्या जोरावर आणि रणनीतीमुळे उमेदवार निवडून आल्याचा दावा या बॅनरद्वारे करण्यात आला होता. मात्र, सोमवारी सकाळी या बॅनरवर काळी शाई फेकल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
दया अणावकर यांची 'किंगमेकर' भूमिका
या निवडणुकीत दया अणावकर यांनी स्वतः पावशी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि मित्रमंडळासह उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार केला. विजयानंतर लावलेला हा बॅनर म्हणजे एका प्रकारे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यावर झालेल्या शाईफेकीमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. भरचौकातील बॅनरवर शाई फेकून विरोध दर्शवणारे हे अज्ञात कोण? आणि ही शाईफेक राजकीय सूडापोटी झाली की निव्वळ खोडसाळपणा? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे पावशी मतदारसंघातील राजकीय ईर्ष्या आता चव्हाट्यावर आली आहे. कुडाळच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची शक्यता.










