
सावंतवाडी : भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी केली. ते म्हणाले, भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शालेय मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शासकीय वन जमिनींमध्ये सौर कुंपण घालून अशा कुत्र्यांची सोय करावी, जिथे त्यांना अन्न-पाणी पुरवले जाईल. यामुळे लोकवस्तीतील उपद्रव कमी होईल. नसबंदी मोहिमेमुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत घट होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल तर पाळीव कुत्र्यांसाठी परवाना अनिवार्य करावा, त्यांचे नियमित लसीकरण व्हावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी असं मत व्यक्त केले. तर हा प्रश्न जनसामान्यांच्या जीवाशी निगडित असल्याने, आगामी अधिवेशनात सर्व लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने विचार करून ठोस कायदा करावा अशी मागणी श्री. मसुरकर यांनी केली आहे.











