'त्या' ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याची मागणी

चार वर्षांपूर्वी फळविक्रेत्याचा गेलेला नाहक बळी
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 12, 2026 15:58 PM
views 110  views

सावंतवाडी : शहराचे वैभव असलेल्या मोती तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चार वर्षांपूर्वी एका फळविक्रेत्याचा नाहक बळी गेलेल्या ठिकाणी तात्काळ संरक्षण भिंत उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे अध्यक्ष रवी जाधव यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. सध्या सुरू असलेल्या फूटपाथच्या कामासोबतच हे काम पूर्ण करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

चार वर्षांपूर्वी मंगळवार बाजारादरम्यान कोर्टाकडून बाजाराकडे जाणाऱ्या वळणावर, फूटपाथवर फळ विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याचा तोल जाऊन तो थेट नाल्यात कोसळला होता. त्यावेळी रवी जाधव यांनी नागरिकांच्या मदतीने नाल्यात उतरून त्या विक्रेत्याला बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळीही संरक्षण भिंतीची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून या नाल्यात बसवण्यात आलेल्या कृत्रिम वन्यप्राण्यांमुळे हा भाग पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सहलीची मुले आणि पर्यटक हे प्राणी पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी करतात. अशावेळी सुरक्षेसाठी कठडा किंवा भिंत नसल्यास पुन्हा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.