योगशिक्षक शेखर बांदेकर यांचा खास सन्मान

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 08, 2026 20:05 PM
views 19  views

सावंतवाडी : योगसाधनेच्या माध्यमातून समाजस्वास्थ्य सुदृढ करणाऱ्या सिंधुदुर्ग येथील फिटनेस योग अकॅडमीचे संचालक आणि प्रसिद्ध योगशिक्षक शेखर बांदेकर यांना 'इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026' देऊन गौरविण्यात आले आहे. राजस्थान येथील प्रतिष्ठित ज्ञान उदय फाउंडेशनच्या वतीने देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो.  यावर्षी 'ऑनलाइन आणि ऑफलाइन योगवर्ग' या श्रेणीतून  बांदेकर यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

नि:शुल्क योगसेवेची राष्ट्रीय स्तरावर दखल

शेखर बांदेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिटनेस योग अकॅडमीच्या माध्यमातून योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता ऑनलाइन स्वरूपात देशभर नि:शुल्क योग वर्ग सुरू केले आहेत. त्यांच्या या निस्वार्थी योगसेवेची दखल घेऊनच ज्ञान उदय फाउंडेशनने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सातासमुद्रापार पोहोचली योगसाधना

बांदेकर यांच्या ऑनलाइन वर्गांमुळे आज बांदा, सावंतवाडी, कुडाळ, देवगड यांसारख्या स्थानिक भागांसह कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, अक्कलकोट अशा विविध शहरांतील नागरिक योगाशी जोडले गेले आहेत. इतकेच नव्हे तर दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि थेट अमेरिकेतूनही अनेक योगप्रेमी दररोज त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित योगाभ्यास करत आहेत.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

ज्ञान उदय फाउंडेशनचे डायरेक्टर नागेश राठोर सर यांनी श्री. बांदेकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. एकीकडे व्यावसायिकता वाढत असताना दुसरीकडे निरंतर आणि मोफत योगसेवा देणाऱ्या बांदेकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.