सावंतवाडीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 08, 2026 19:54 PM
views 21  views

सावंतवाडी : तालुक्यातील ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समिती मतदार संघासाठी मतदान झाले असुन उद्या मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून जिमखाना मैदानावर होणार आहे. पहिली मतमोजणी माडखोल पंचायत समिती मतदार संघातून सुरू होणार आहे. पहिल्या माडखोल पंचायत समितीच्या जिल्हा परिषद मतदार संघात सहा केंद्रांची मोजणी सुरू होईल आणि नंतर एकेका  पंचायत समिती गणानुसार जिल्हा परिषद मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांना आहे.

सावंतवाडी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी वासुदेव नाईक निवडणूक यंत्रणा सांभाळत आहेत. माडखोल पंचायत समितीच्या सहा केंद्राची जिल्हा परिषद मतदार संघासह मतमोजणी प्रथम होईल नंतर कलबिंस्त पंचायत समितीच्या माडखोल जिल्हा परिषद मतदार संघासह ८ केंद्रांची मतमोजणी होईल. आंबोली पंचायत समितीच्या अंबोली जिल्हा परिषद मतदार संघासह १० केंद्रांची, त्यानंतर विलवडे पंचायत समितीच्या अंबोली जिल्हा परिषद मतदार संघासह अकरा केंद्राची मतमोजणी होणार आहे. कोलगाव पंचायत समितीच्या कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघासह सहा केंद्राची तर कारीवडे पंचायत समितीच्या कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघासह सात केंद्रांची मतमोजणी होईल. तळवडे पंचायत समितीच्या तळवडे जिल्हा परिषद मतदार संघ सह ९ केंद्र तर मळगाव पंचायत समितीच्या तळवडे जिल्हा परिषद मतदार संघ सह ८ केंद्र मतमोजणी होईल.माजगाव पंचायत समितीच्या माजगाव जिल्हा परिषद सह ८ केंद्रावर तर चराठे पंचायत समितीच्या माजगाव जिल्हा परिषद मतदार संघासह ७ केंद्रांची मतमोजणी होईल.इन्सुली पंचायत समितीच्या जिल्हा परिषद मतदार संघ आठ केंद्रांची तर इन्सुली जिल्हा परिषद नऊ केंद्रांची मतमोजणी होईल. मळेवाड पंचायत समितीच्या मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघातील नऊ केंद्रांची तर न्हावेली पंचायत समितीच्या मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघासह सात केंद्रांची मतमोजणी होईल. आरोंदा पंचायत समितीच्या आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघ ९ केंद्रांची तर सातार्डा पंचायत समितीच्या आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघ सात केंद्रांची मतमोजणी होईल.

बांदा पंचायत समितीच्या सात केंद्राची आणि तांबोळी पंचायत समितीच्या सात केंद्रांची मतमोजणी शेवटी होणार आहे. बांदा जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रमोद कामत बिनविरोध ठरले असल्याने जिल्हा परिषद आणि शेर्ले पंचायत समितीचे उमेदवार महेश धुरी हे बिनविरोध ठरले आहेत. त्यामुळे इथे मतदान झाले नाही. पंचायत समितीच्या गणांची जिल्हा परिषद मतदार संघासह मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.