
कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा उद्या दि. २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयासमोर भव्य स्टेजही उभारण्यात येत आहे. या जाहिर प्रचार सभेला मुख्यमंत्र्यांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांच्यासहीत विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येत आहेत. या निवडणुकांत सर्व जागांवर यश मिळविण्याच्या अनुषंगाने महायुतीने कंबर कसली आहे. गावोगावी प्रचार, नियोजनही जोरदार करण्यात येत आहे. याच प्रचाराच्या अनुषंगाने ही जाहिर प्रचार सभा कणकवलीत होत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर होणाऱ्या या जाहिर प्रचार सभेच्या अनुषंगाने भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. यात जाहिर प्रचार सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.










