
सिंधुदुर्गनगरी : ‘आम्ही साहित्यप्रेमी'च्या जानेवारीच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी ३० रोजी सायंकाळी ५ वाजता ’सुर्वे यांचे विद्यापीठ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यावेळी कवी नारायण सुर्वे यांच्यावर बोलतील. 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी' या साहित्यिक व्यासपीठाचा हा सलग अकरावा मासिक कार्यक्रम आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.
कवी नारायण सुर्वे हे मराठीतील स्वतंत्र शैली असलेले, मोजकेच पण प्रभावी लेखन केलेले प्रतिभावंत साहित्यिक. नारायण सुर्वे यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला. २०२६ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणाऱ्या व असंख्य वेदना निमुटपणे सोसणाऱ्या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले.
१९६२ रोजी “ऐसा गा मी ब्रह्म" हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९६६ साली " माझे विद्यापीठ”, १९७५ ला “जाहीरनामा” तर १९९५ रोजी " नव्या माणसाचे आगमन" हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कृष्ण चंदर यांच्या उर्दू कथांचा सुर्वे ह्यांनी केलेला अनुवाद “तीन गुंड आणि सात कथा” या नावाने १९६६ रोजी प्रसिद्ध झाला. “दादर पुलाकडील मुले” ही त्यांची अनुवादित कादंबरी, त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद “ऑन द पेव्हमेंट्स ऑफ लाइफ" शीर्षकाने १९७३ साली प्रसिद्ध झाला आहे. संवादमय शैली हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य; दैनंदिन गरजेसाठी व आपल्या हक्क आणि अस्तित्वासाठी झगडणारा माणूस सुर्वे ह्यांच्या कवितेतील अनुभवसृष्टीच्या मध्यवर्ती भुमिकेत आहे. १६ ऑगस्ट २०१० रोजी त्यांचे ठाणे येथे निधन झाले.
ज्येष्ठ कवयित्री श्रीमती संध्या तांबे या कार्यक्रमात नारायण सुर्वे यांच्या कवितेचे अनेक पैलू उलगडून दाखवणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.










