
सावंतवाडी : ''क्रांतीज्योती विद्यालय'' मराठी माध्यम चित्रपटाच्या यशानंतर कोकणवासीयांचे आभार मानण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या सिनेमाच्या टीमने कोकणसाद LIVE व दैनिक कोकणसादच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेता अमेय वाघ यांचा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोकणवासीयांना भेटून इथल्या खाद्यसंस्कृतीची चव चाखून फार आनंद झाला. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद बघता इथल्या प्रेक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी कोकण दौरा केला होता. मराठी सिनेमांना असाच भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांनी द्यावा, असे आवाहन अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी केले.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी शाळेचं अस्तित्व, तिच्याशी जोडलेली भावनिक नाळ आणि मराठी भाषेचा अभिमान मोठ्या पडद्यावर ठामपणे मांडणारा हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमाचा मानकरी ठरत आहे. नवीन वर्षातला पहिला मराठी चित्रपट असलेल्या क्रांतिज्योती विद्यालयच्या प्रदर्शनानंतर पहिल्याच आठवड्यापासून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. सध्या तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

या यशाचा आनंद प्रेक्षकांसोबत साजरा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि प्रमुख कलाकार सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ कोकण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथील चित्रपटगृहांना भेटी देत त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.
प्रेक्षकांनी ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’वर ज्या पद्धतीने प्रेम आणि विश्वास दाखवला, तो आमच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. हा चित्रपट केवळ आमचा नाही, तर प्रत्येक मराठी प्रेक्षकाचा आहे. मराठी भाषेबद्दलचा निर्माण होणारा न्युनगंड, मराठी शाळा बंद पडत चालल्याच्या बातम्या बघून हा चित्रपट करण्याची आवश्यकता भासली. सिनेसिकांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत असून कोकणातील या प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही हा दौरा केला असे मत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी व्यक्त केले. तर कोकणातील चित्रपटगृह बघून इथली चित्रपटगृह मुंबईच्या तोडीस तोड असल्याचे उद्गार अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी काढले. तसेच आपल बालपण अनुभवण्यासाठी ते पुन्हा जगण्यासाठी आवर्जून चित्रपट बघावा असा आवाहन अभिनेता अमेय वाघ यांनी केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या या टिमने दैनिक कोकणसाद अन् कोकणसाद LIVE च्या प्रधान कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांची मुलाखत देखील घेण्यात आली. याप्रसंगी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि प्रमुख कलाकार सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांचा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सौ. पाटील यांच्यासह टीम कोकणसाद उपस्थित होती. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार कलाकारांची फळी झळकत आहे. चित्रपटाची निर्मिती चलचित्र मंडळी यांनी केली असून क्षिती जोग या निर्माती आहेत. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.
चित्रपटाची ही यशस्वी वाटचाल आणि कलाकारांचा कोकण दौरा प्रेक्षकांमध्ये आणखी उत्साह निर्माण करत असून येत्या काळातही ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मराठी प्रेक्षकांचे मन जिंकत राहील असा विश्वास चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे.










