सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर

“जि. प. साठी भाजप ३१, सेना १९,| पं. स. भाजप ६३, सेना ३७
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 18, 2026 18:06 PM
views 265  views

कणकवली : महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांपैकी ३१ जागा भारतीय जनता पार्टी तर १९ जागा शिवसेना (शिंदे गट) लढवणार असून, पंचायत समितीच्या जिल्ह्यातील १०० जागांपैकी ६३ जागा भाजप तर ३७ जागा शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याची अधिकृत घोषणा भाजप नेते, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री नाम. नितेश राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सचिन वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खा. नारायण राणे म्हणाले की, भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती झाली असून येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार आहेत. जागावाटपाबाबत कोणतेही गैरसमज, वाद किंवा मतभेद झालेले नसून सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा मतदारसंघनिहाय जागावाटप

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा परिषद ११ व पंचायत समिती १७ जागा, तर शिवसेना जिल्हा परिषद ६ व पंचायत समिती १७ जागा लढवणार आहे. कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा परिषद ४ व पंचायत समिती १७ जागा, तर शिवसेना जिल्हा परिषद ११ व पंचायत समिती १५ जागा लढवणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप जिल्हा परिषद १६ व पंचायत समिती ३१ जागा, तर शिवसेना जिल्हा परिषद २ व पंचायत समिती ५ जागा लढवणार आहे.

खा. राणे पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत सामावून घेण्यात आले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिकांच्या निकालाप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही महाराष्ट्रात महायुतीचाच विजय होईल आणि त्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर राहील, असा दावा त्यांनी केला. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडेल. विरोधकांकडे लढण्याइतकी ताकद उरलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळेल, असेही खा. राणे म्हणाले. सोमवारी उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, सर्व जागांवर सक्षम व ताकदवान उमेदवार देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातही महायुती झाली असून तेथील भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेतल्याची माहिती देण्यात आली. मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनीही भेट घेतल्याचे खा. राणे यांनी सांगितले. यावेळी खा. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना केवळ नावापुरती उरली असून जनाधार संपला आहे. त्यांनी आतापर्यंत कधी देवासमोर हात जोडले नाहीत, आता देवावर विसंबून राहिल्यास सत्ता येणार का, असा सवाल खा. राणे यांनी उपस्थित केला. आमची भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी युती राज्यात आणि जिल्ह्यात मजबूत असून बहुमत आमच्याकडे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.