
देवगड : देवगड महाविद्यालयात शिक्षण विकास मंडळ, देवगड यांच्या वतीने देवगड युवा महोत्सव 2025–26 चे आयोजन दिनांक 16 व 17 जानेवारी 2026 रोजी दोन दिवस करण्यात आले होते. “युवाशक्ती – उद्याच्या बदलाची शिल्पकार” ही या महोत्सवाची प्रेरणादायी संकल्पना होती.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय प्रा. डॉ. स्मिता सुरवसे (संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ) या उपस्थित होत्या. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विकास मंडळ देवगड संस्था सभापती एकनाथ तेली यांनी अध्यक्षस्थान भूषविले. शिक्षण विकास मंडळ, देवगडचे विविध संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख अतिथी, सभापती, संस्था पदाधिकारी, प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी केले.प्रमुख अतिथी प्रा. डॉ. स्मिता सुरवसे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित युवा वर्गास मोलाचे मार्गदर्शन केले. भविष्यातील संधी, करिअरच्या विविध शक्यता व स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर कसा करावा याविषयी त्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून प्रभावी व दिशादर्शक संबोधन केले व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.
सभापती एकनाथ तेली यांनी आजची युवाशक्ती समाजपरिवर्तनात कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यावर प्रकाश टाकत युवकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजयकुमार कुनूरे यांनी युवाशक्ती हीच देशाच्या प्रगतीची दिशा ठरवणारी शक्ती असल्याचे प्रतिपादन करून महोत्सवास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शिक्षण विकास मंडळ, देवगड संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रहास मर्गज, कार्यवाह वैभव बिडवे, सहकार्यवाह तुकाराम तेली व विश्वामित्र खडपकर, तसेच नियामक समिती सदस्य शैलेश महाडिक हे मान्यवर उपस्थित होते.यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले.
उद्घाटन दिनाच्या उत्तरार्धात रिल मेकिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला व विविध कलागुणांना प्रभावी व्यासपीठ मिळाले. एकूणच देवगड युवा महोत्सवाचा पहिला दिवस उत्साह, प्रेरणा व युवाशक्तीच्या अभिव्यक्तीने भारलेला ठरला.देवगड युवा महोत्सवाचा दुसरा दिवस विविध सांस्कृतिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घडवणारा ठरला. दिवसाची सुरुवात फिश पाँड व सेल्फी मेकिंग या आकर्षक व उत्साहवर्धक स्पर्धांनी झाली. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मनमुराद आनंद घेतला.यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी कु. संभाजी माने यांची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामुळे संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. यानंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारे विविध सांस्कृतिक नृत्य व गीतगायन कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता व मेहनत प्रकर्षाने दिसून आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे मनःपूर्वक कौतुक केले.
महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उपप्राचार्य प्रा. सिरसाठे रसाटे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










