
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रात उमटले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात त्यांनी नमूद केले आहे की, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही. कोणत्याही नेत्यावर माझी वैयक्तिक नाराजी नाही, मात्र माझा राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा.” हा राजीनामा त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सादर केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस मंडळात राजकीय भूकंप घडून आला. ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, तसेच अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख मिळून एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आजच करण्यात आली होती. मात्र जागावाटप फॉर्म्युल्यानंतर लगेचच भाजपमध्ये उफाळून आलेले हे नाराजी नाट्य आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणारे ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










