
सावंतवाडी : उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ही इमारत भव्य दिव्य, सुसज्ज व अत्याधुनिक अशी होईल. मात्र, केवळ इमारत सुसज्ज व प्रशस्त होऊन चालणार नाही तर ज्या जनतेसाठी ही इमारत होत आहे त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागावेत ही अपेक्षा आहे. या इमारतीच्या माध्यमातून लोकाभिमुख व गतिमान कारभार व्हावा, अशा सूचना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केल्या.
सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते तर स्थानिक आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रांताधिकारी समीर घारे, लखमराजे भोंसले, तत्कालीन प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सचिन वालावलकर, उप अभियंता अजित पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, आज अतिशय महत्वाच्या अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत. ही इमारत किती जूनी आहे व या नूतन इमारतीचं महत्व किती आहे हे यावेळी सांगण्यात आले. या तालुक्याचे हे सत्ताकेंद्र आहे. थोडक्यात मिनी मंत्रालयच आहे. ही इमारत दोन वर्षात उभी राहावी अशी मुदत आहे मात्र ती एका वर्षात पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत. या इमारतीतून लोकाभिमुख व पारदर्शक कारभार व्हावा ही इच्छा आहे. सुसज्ज इमारत आम्ही तुम्हाला देतोय मात्र तुम्ही आमच्या जनतेची काळजी घ्यावी ही अपेक्षा. तुम्ही एसीत व जनता बाहेर ताटकळत बसू नये. तुमची जनतेशी वागणूक कशी असावी हे महत्वाचं आहे. तुम्ही जनतेशी निदान चांगलं बोलावं व त्यांचं समाधान व्हावं ही अपेक्षा आहे. शेवटी काम करण्यासाठी तुम्हाला कार्यालय दिलं जातं. नाही हा शब्द शब्दकोशातून काढून टाका. नियमात बसवून लोकांची काम त्वरीत व्हायला हवीत. प्रशासन हे नेहमी पारदर्शक व गतिमान असायला हव. आमचं कामं होणारचं असा विश्वास जनतेला वाटायला हवा,असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांची काम होणं गरजेचं. आ. केसरकर यांची काम करायची पद्धत प्रेमानं पण आमची पद्धत वेगळी. केसरकर कसोटीवाले मी मात्र ट्वेंटी वाला आहे. प्रशासन कसं चालवायचं हे राणे साहेब तसेच केसरकर यांना चांगलं माहित आहे व त्यांच्याच तालमीत व मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे जनतेची कामे हे प्राधान्य लक्षात ठेवून काम करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी या कार्यालयाचा उपयोग व्हावा. सावंतवाडी विभागाच्या बाजूलाच असलेल्या मोपा व चिपी विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या विभागात होणार आहे. त्यातून मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. त्यासाठी आपण व्यवस्थित काम करायला हवे. या इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. ती इमारत किमान २५ वर्ष तरी टिकावी असं काम व्हावं, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रास्ताविकपर भाषणात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय नूतन इमारत बांधकामाविषयामागची संकल्पना विषद केली. स्वागत व आभार प्रांताधिकारी समीर घारे यांनी मानले. आपल्या कार्यकालात जनतेची कामे निश्चितच प्राधान्याने व वेळेत केली जातील व कोणतीही तक्रार येऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले. यावेळी महसूल बांधकाम तसेच अन्य विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच सावंतवाडी नगर परिषदेचे नवनिर्वाचित व आजी-माजी नगरसेवक, शिवसेना व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भूमिपूजन प्रसंगी आमदार दीपक केसरकर यांनी देखील शुभेच्छा देताना लोकाभिमुख प्रशासनाची गरज बोलून दाखवली. उपविभागीय अधिकाऱ्यांचे नूतन कार्यालय हे केवळ भौतिक सुविधा पुरतं मर्यादीत न राहता ते लोकाभिमुख ठरेल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात विकासाची घोडदौड सुरू आहे. त्याला जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे व सर्वच अधिकाऱ्यांची साथ लाभत आहे. त्यामुळे विकासाचा हा वारू न थांबता अधिक गतीने थांबता अधिक गतीने दौडत जाईल, असा विश्वास माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.










