
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचे आज गोवा राज्याच्या सीमेवर पत्रादेवी चेकपोस्टवर हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य व जल्लोषी स्वागत करण्यात आले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी खास. राणे यांचे जल्लोषी स्वागत केले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले.
ढोल ताशांच्या गजरात यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 'राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है ' ' हमारा नेता कैसा हो, नारायण राणे जैसा हो, आवाज कुणाचा, हर हर महादेव, कोण आला रे कोण आला, कोकणचा वाघ आला, जय भवानी जय शिवाजी, अशा बुलंद घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आम. दीपक केसरकर यांच्या समर्थनार्थ देखील यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. नारायण राणे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मुंबईतून कोकणात प्रवेश करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण ते बांद्यापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ज्या पद्धतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले होते. तोच उत्साह व तोच दिमाख आज गोवा राज्याच्या सीमेवर पत्रादेवी येथे पाहायला मिळाला. त्यामुळे त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. यावेळी उपस्थित अनेक जुन्या जाणत्या राणे समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्याच पद्धतीने जल्लोषी स्वागत होत असल्याचा अनुभव याची देही याची डोळा अनुभवता आला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. गेल्या काही वर्षात राजकारणातून थोडे दूर असलेले अनेक जूने कार्यकर्ते आज कित्येक वर्षांनी भेटल्यावर एकमेकांना आलिंगन देत होते. तर जून्या आठवणी मनात दाटून येत होत्या त्यांना वाट मोकळी करून देत होते. काळाच्या ओघात शिवसेना व भारतीय जनता पार्टीत सहभागी झालेले जूने सहकारी पुन्हा एकदा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
गोवा राज्याच्या सीमेवर पत्रादेवी चेक पोस्ट पासून ते बांदा शहरापर्यंत सुमारे ४ ते ५ किलोमीटर पर्यंत महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुरुषांप्रमाणेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. काही इतर पक्षातील जून्या राणे समर्थक कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी विशेष दाद देऊन गेली. खा. नारायण राणे यांचे पत्रादेवी चेक पोस्ट येथे आगमन होताच त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. आपल्या नेत्याला भेटण्यासाठी व स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे पुष्पगुच्छ स्वीकारताना त्यांचे प्रेम पाहून खा. राणे देखील गहिवरून गेले. यावेळी त्यांच्या सोबत सौ. निलम राणे देखील उपस्थित होत्या. पत्रादेवी येथून विशेष व्हॅनिटी व्हॅन मधून ते उभयता पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे व प्रमुख पदाधिकारी कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी आपल्या नेत्याला एकदा हात देण्यासाठी व डोळे भरून पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाडीला अक्षरशः गराडा घातला होता. 'दादा दादा ' अशी हाक देत कार्यकर्ते आपल्या नेत्याचे लक्ष आपल्याकडे जावे यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. गर्दीची तमा न बाळगता आपल्या लाडक्या दैवताच्या दर्शनासाठी होत असलेली कार्यकर्त्यांची एकूणच धडपड व उत्साह अलौकिक व अवर्णनीय असाच होता. एकंदरीतच हा स्वागत सोहळा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील एक अविस्मरणीय सोहळा ठरला. खा. नारायण राणे यांच्या होणाऱ्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व शेकडो पोलिस कर्मचारी व वाहतूक पोलीस यावेळी उपस्थित होते. शेकडो वाहनांची गर्दी व हजारो राणे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पोलिसांना गर्दी काबू करताना खूपच धडपड करताना दिसून आले.










