बांद्यात आठ फूट खड्ड्यात पडली बँक कर्मचारी

दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला
Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2026 16:19 PM
views 345  views

सावंतवाडी : बांदा येथील उड्डाणपूलच्या समोर डिव्हायडर मधील आठ फूट मोठ्या खड्ड्यामध्ये बँक कर्मचारी मनीषा मीना या रस्त्याचा अंदाज चुकून त्या खड्ड्यामध्ये पडल्या. रस्ता क्रॉस करताना ही घटना घडली.  खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्या मोठमोठ्याने आरडाओरड करत होत्या. परंतू, आवाज कोणापर्यंतर पोहोचत नव्हता. अखेर त्याच जखमी अवस्थेत पर्स मधून मोबाईल काढून आपल्या बँक स्टाफच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून बोलवून घेतले. कर्मचारी तेथे लगेच आला. परंतु घटनास्थळी त्या कर्मचाऱ्याला ती दिसेनाशी झाली होती.

अखेर त्याने खड्ड्यामध्ये टॉर्च मारून पाहिलं तेव्हा ती त्या खड्ड्यामध्ये पडलेली दिसली. तेव्हा ती थोडीफार शुद्धीत होती. यावेळी तेथील नागरिकांनी तिला लगेच बाहेर काढत बांदा आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले. तिच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत असल्यामुळे अधिक उपचारासाठी तिला अमोल सावंत यांच्या प्रायव्हेट ॲम्बुलन्सने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा मुद्राळे व रवी जाधव यांनी तीला उपचारासाठी  पूर्ण सहकार्य केले. परंतु, रस्त्यामध्ये असे खड्डे मारून ठेवल्यावर रात्रीच्या वेळी त्या खड्ड्यात पडून कोणाचातरी जीव जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. तिचं नशीब चांगलं कि ती बेशुद्ध पडली नाही नाहीतर ती खड्ड्यामध्ये आहे हे कोणाला समजलं नसतं. प्रशासनाने याची दखल घेऊन असे जीवघेणे खड्डे त्वरित भरावे अशी विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केली आहे. याप्रसंगी रूपा मुद्राळे व त्यांचे स्टाफ मेंबर अमोल त्रिवेदी, मंगेश राठोड व राजेश कुमार जेना तिला धीर देण्यासाठी तिच्यासोबत आहेत .