
सावंतवाडी : नव्याण्णववे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा ज्येष्ठ लेखक कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे होणार आहे. या संमेलनामध्ये चार परिसंवाद, दोन मुलाखती, दोन कविसंमेलने, पुस्तकचर्चा, कविकट्टा, नाट्यसादरीकरण अशी विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल आहे. या संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा प्रवीण बांदेकर हे घेणार आहेत. त्यांच्यासोबत नव्या पिढीतील समीक्षक व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ रणधीर शिंदे सहभागी होणार आहेत.
साहित्य संमेलनातील ज्येष्ठांची मुलाखत हे संमेलनातील एक प्रमुख आकर्षण असते. या वर्षीच्या संमेलनात कवयित्री अनुराधा पाटील यांच्याबरोबर ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांचीही मुलाखत होणार आहे. अनुराधा पाटील यांना ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहासाठी प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सामान्य स्त्री हे केंद्रबिंदू असलेल्या अनुराधा पाटील यांची कविता मराठीतील महत्त्वाची कविता आहे. या कवयित्रीची कविता, समाज, भवताल, संस्कृती, राजकीय सामाजिक परिस्थिती इत्यादीविषयी मते जाणून घेण्यासाठी प्रा. प्रवीण बांदेकर व प्रा. रणधीर शिंदे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. प्रा. बांदेकर व प्रा. शिंदे यांनी अनुराधा पाटील यांच्या कवितेविषयी समीक्षात्मक विवेचक लेखनही केले आहे. अनुराधाबाईंच्या लेखनाविषयीच्या समीक्षा ग्रंथामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. या मुलाखतीची उत्सुकता साहित्याचे वाचक, अभ्यासक व रसिकांना आहे.










