
सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत म्हाळेवाडी, तालुका चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी दोन दिवसीय कौशल्य विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील सुमारे ८० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणामध्ये महिलांना घरगुती उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे मसाले तयार करण्याचे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले, तसेच एक दिवसीय साबण निर्मितीचे प्रशिक्षण राबवण्यात आले. मसाले प्रशिक्षणासाठी गडहिंग्लज येथील अनुभवी प्रशिक्षक वंदना कातकर, तर साबण निर्मितीसाठी कागल येथील मेघा भोसले यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान कच्चा माल निवड, प्रक्रिया, पॅकिंग, खर्च–नफा गणित आणि विक्रीच्या संधी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास सरपंच सी. ए. पाटील, उपसरपंच विजय मर्णहोळकर, ग्रामसेवक संदीप चौगुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या सौ. अमृता कांबळे, सौ. कल्पना पाटील, सौ. शांताबाई नांदवडेकर, श्रीमती अनिता पाटील, सौ. माधवी कांबळे (आशा सेविका), सौ. शोभा पाटील (अंगणवाडी सेविका), तसेच CRP सौ. प्रियांका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून घरबसल्या उत्पादन करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा मार्ग खुला झाला आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढणे, स्वावलंबन साधणे आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात हातभार लावणे हा या उपक्रमाचा मुख्य फायदा ठरणार आहे.कोकण कला व शिक्षण विकास संस्था ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, कौशल्य विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडणी हे संस्थेचे प्रमुख धोरण आहे. ग्रामीण महिलांना सक्षम करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या चंदगड प्रतिनिधी मनस्विनी कांबळे यांनी केले.










