चुकीच्या कामांना कडाडून विरोध होईल...

मतदारांनाही बदल हवे असतात | पराभवानंतर समीर नलावडेंची पहिलीच पत्रकार परिषद
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 26, 2025 13:41 PM
views 82  views

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मला पराभव स्‍विकारावा लागला असला तरी यापुढेही मी कणकवलीकर जनतेची सेवा करतच राहणार आहे. त्‍यासाठीच समीर नलावडे जनसंपर्क कार्यालय आजपासून सुरु केले आहे. या कार्यालयाच्‍या माध्यमातून जनतेच्‍या समस्‍या सोडविण्‍याचा प्रामाणिकपणे प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही माजी नगराध्‍यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

सुरु करण्‍यात आलेल्‍या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. नलावडे म्‍हणाले, समीर नलावडे जनसंपर्क कार्यालयाचे मी आज उद्‍घाटन केले. आतापर्यंत केली, तशीच जनतेची प्रामाणिकपणे सेवा मी यापुढेही जनसंपर्क कार्यालयाच्‍या माध्‍यमातून करेन. लोकांना माझ्‍याशी मनमोकळेपणे बोलता यावे, यासाठी हे कार्यालय आहे. अर्थातच हे कार्यालय पक्षीय नसून माझे जनसंपर्क कार्यालय आहे. त्‍यामुळे शिवाजी महाराजांचा मोठा फोटो कार्यालयात लावला आहे. तर कार्यालयाचा प्रवेशद्‍वारानजीक आमचे नेते नारायण राणे, नीतेश राणे यांचेही फोटो लावले आहेत. जनतेच्‍या अनेक लहान - लहान अडचणी असतात, त्‍या सोडविण्‍याचा प्रयत्‍न मी या कार्यालयाच्‍या माध्‍यमातून करणार आहे. नागरिक आपल्‍या कामांसाठी नगरपंचायतीमध्‍ये सकाळपासून ते दुपारपर्यंत येत असतात. त्‍यामुळे माझे कार्यालयही याच वेळेत सुरु असणार आहे. त्‍यानंतरही कुणाला गरज भासल्‍यास कार्यालयाच्‍या प्रवेशद्‍वारानजीक माझा मोबाईल नंबर नोंदविण्‍यात आला आहे.

... तर कडाडून विरोध होईल

नलावडे पुढे म्‍हणाले, कणकवलीकर जनतेने भाजपला बहुमत दिले आहे. त्‍यामुळे विकासाच्‍या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. विकासाला आमचा शंभर टक्‍के पाठिंबा असणार आहे. पालकमंत्री नीतेश राणेंच्‍या माध्‍यमातून कणकवली शहरासाठी जास्‍तीतजास्‍त निधी कसा आणता येईल, यासाठी मी नेहमीच प्रयत्‍न करणार आहे. पण, नगरपंचायतीत चुकीचे काम होत असेल तर आमचे सर्व नगरसेवक त्‍याला कडाडून विरोध करतील. कारण, कणकवली शहर विकसीत व्‍हावे, अशी आमची भूमिका असल्‍याचेही नलावडे म्‍हणाले.

मतदारांनाही बदल हवे असतात

या निवडणुकीत काही प्रभागांमध्‍ये मला तर काही प्रभागांमध्‍ये आमच्‍या नगरसेवक पदाच्‍या उमेदवाराला जास्‍त मतदान झाले. अशा बाबी निवडणुकांमध्‍ये होत असतात. अगदी माझी पत्‍नी नगरसेविका पदासाठी लढत होती, त्‍या प्रभागातही तिला माझ्‍यापेक्षा जास्‍त मतदान झाले आहे. कधीकधी मतदारांनाही बदल हवे असतात. त्‍यामुळेच अनेक ठिकाणी आम्‍हाला 'पॅनेल टू पॅनेल' मतदान झाले नसेल, असेही नलावडे म्‍हणाले.

... त्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ

नगरपंचायत निवडणुकीआधी कणकवली शहराला साडेतेरा कोटींचा निधी प्राप्‍त झाला होता. या निधीतील कामांनाही लवकरच सुरुवात होईल. बंडू हर्णे, बंडू गांगण, अण्‍णा कोदे हे आमचे सर्व कार्यकर्ते नारायण राणेंसोबत नेहमीच प्रामाणिक राहीले आहेत. या सर्वांनाच सोबत घेऊन यापुढेही कणकवलीकरांची सेवा करत राहणार आहे. नगरपंचायत आमच्‍या ताब्‍यात असताना आम्‍ही पर्यटन महोत्‍सवासारखे अनेक उपक्रम राबवायचो. माझ्‍यासह बंड हर्णे, बंडू गांगण, अण्‍णा कोदे असे आम्‍ही चर्चा करून निर्णय घ्‍यायचो. आता मी नगराध्‍यक्ष पदावर नाही. तरीही येत्‍या काळात काय उपक्रम राबविता येतील, याविषयी आम्‍ही सर्वजण चर्चा करून निर्णय घेऊ, असेही नलावडे म्‍हणाले.

जनतेची सेवा करतच राहणार

भाजप प्रदेशाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण, पालकमंत्री नीतेश राणे यांच्‍या आशिर्वादाने आम्‍ही निवडणूक लढलो. यात माझा पराभव झाला असला तरी आमचे ९ नगरसेवक विजयी झाले आहे. साहजिकच कणकवलीकरांनी आम्‍हाला बहुमत दिले आहे. आमचे काही नियोजन चुकले असे,  त्‍यामुळे या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, पराभवाला न घाबरता मी जनतेची सेवा करतच राहणार आहे. कारण हार जीत पचविण्‍याची ताकद आम्‍हाला नारायण राणेंनी दिली आहे, असेही नलावडे म्‍हणाले.