
दोडामार्ग : गेले काही महिने कळपातून विभक्त झालेला ओंकार हत्ती गणेश टस्करच्या दिशेने कूच करत असल्याने, दोघांमध्ये पुन्हा मोठा संघर्ष होणार अशी भीती इथले वनविभाग व शेतकरी ग्रामस्थांमध्ये पसरली होती. मात्र, शुक्रवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घटनाक्रमात सर्वांचा अंदाज चुकवत ते दोघे एकत्र आले. यावेळी सुदैवाने कोणतेही युद्ध झाले नाही. काही वेळानंतर ओंकार पुन्हा कळपापासून विभक्त झाला. त्यामुळे तो नेमका कोणाच्या शोधात आहे? गणेशला घाबरून तर तो विभक्त झाला नसावा ना? असे अनेक कयास यानिमित्ताने बांधले जात होते.
हेवाळे परिसरात शुक्रवारी सकाळी गणेश टस्कर या बलाढ्य नर हत्तीसमवेत एक छोटी मादी, एक मोठी मादी आणि दोन पिल्ले असा पाच हत्तींचा कळप मुक्तपणे वावरताना आढळून आला होता. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ४ च्या सुमारास मेढे परिसरात ओंकार हत्ती दिसून आला. गणेश टस्कर ज्या दिशेने होता, त्याच दिशेने ओंकारची वाटचाल सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये व वनवीभागा मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जर हे दोन हत्ती आमनेसामने आले, तर त्याचे गंभीर परिणाम मानवी वस्ती, शेती, घरे आणि जीवितहानीपर्यंत होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात होती. त्यामुळे वनविभागाने तातडीने लक्ष घालून हालचालींचे बारकाईने निरीक्षण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत होती.
दरम्यान, शुक्रवारी रात्री मेढे परिसरात ओंकार थेट गणेश व इतर हत्तींच्या कळपात जाऊन मिळाला. अपेक्षित द्वंद्व होईल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र आश्चर्यकारकरीत्या कोणताही संघर्ष झाला नाही. साधारण दोन तास हे सर्व हत्ती एकत्र होते. त्यानंतर गणेश टस्कर, मोठी मादी इतर तीन हत्ती पाळये क्षेत्राकडे निघून गेले, तर ओंकारने वेगळी दिशा धरत मेढे परिसरातून दुसऱ्या बाजूने कूच केली. विशेष बाब म्हणजे गणेशसोबत असलेली मोठी मादा हत्ती ही ओंकारची आई आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कळपातून वेगळा राहिलेला ओंकार आता कळपातच स्थिरावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पुन्हा एकदा तो कळपापासून दूर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.










