
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात पार पडले. त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वार्षिक अहवाल वाचनाने झाली. त्यानंतर गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘रिश्ते’ या संकल्पनेवर आधारित मानवी जीवनातील नात्यांचा सुंदर भावबंध उलगडला. समूहनृत्य, गीत व व्हिडिओ सादरीकरणांमधून आई-मुल, वडील-मुलगा, बहीण-भाऊ यांसोबतच विद्यार्थी-शिक्षक व मित्रत्वाच्या नात्यांचेही प्रभावी चित्रण करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कविता शिंपी म्हणाल्या की, आजच्या इंटरनेटप्रधान युगात नाती आभासी होत चालली आहेत. अशा परिस्थितीत नाते, संस्कार, शिस्त, कुटुंब तसेच शिक्षक-विद्यार्थी संबंधांची जाणीव करून देणारी ‘रिश्ते’ ही संकल्पना अत्यंत आवश्यक आहे. वायबीएसने निवडलेली ही थीम विद्यार्थ्यांना संवेदनशील, जबाबदार आणि उत्तम नागरिक घडविण्यास प्रेरणा देईल.
कार्यक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळच्या सत्रात विविध स्पर्धा व सादरीकरणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. संध्याकाळच्या सत्रात माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन ‘नवरस’ या संकल्पनेवर होणार असून आकर्षक ध्वनी व प्रकाशयोजना हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरत आहे.










