भाजीपाल्याच्या कॅरेटखाली मद्यसाठा

वाहनासह ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Edited by: विनायक गांवस
Published on: December 18, 2025 18:34 PM
views 41  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली चेकपोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (१८ डिसेंबर) सकाळी मोठी कारवाई केली. भाजीपाल्याच्या कॅरेटखाली लपवून नेला जाणारा गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आणि महिंद्रा बोलेरो वाहनासह एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सावंतवाडी येथील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, एका वाहनातून अवैध मद्याची वाहतूक होणार आहे. त्यानुसार इन्सुली-सावंतवाडी रस्त्यावरील दत्त मंदिराजवळ सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास पथकाने सापळा लावला. संशयास्पद वाटणाऱ्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर (क्र. MH-08-W-1856) वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या पाठीमागील हौद्यात भाजीच्या रिकाम्या कॅरेटखाली लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे ३५ बॉक्स मिळून आले. या कारवाईत ३ लाख ४९ हजार ३२० रुपये किमतीचे मद्य आणि ५ लाख रुपयांचे बोलेरो वाहन असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपी तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, आणि सिंधुदुर्ग अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईच्या पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सूर्यवंशी यांचा समावेश होता. या प्रकरणाचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत.