
सावंतवाडी : तालुक्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. रेशन कार्डवरील ज्या सदस्यांनी अद्याप ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा धान्याचा लाभ बंद होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील तब्बल १७,७०३ लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने तहसीलदारांनी याबाबत जाहीर आवाहन केले आहे.
सावंतवाडी तालुक्यात एकूण १,०२,९६० लाभार्थी आहेत. त्यापैकी ८५,२५७ लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. मात्र, उर्वरित १७,७०३ लाभार्थ्यांनी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. शासनाच्या निर्देशानुसार, सार्वजनिक वितरण प्रणालीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.
रास्त भाव धान्य दुकान: कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वतः धान्य दुकानात जाऊन ई-पॉस (e-POS) मशीनवर अंगठा (Fingerprint) लावून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे. ऑनलाईन अॅप लाभार्थ्यांनी 'Mera e-KYC App' किंवा 'Mera Ration App' या मोबाईल अॅपचा वापर करूनही आपली प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करावी.
ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर रेशन कार्डशी लिंक नाहीत, त्यांनी तातडीने आपले अपडेटेड आधार कार्ड संबंधित धान्य दुकानदार किंवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. उत्पन्न वाढले असल्यास 'अनुदानातून बाहेर पडा'. ज्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय सेवेत आहेत, निवृत्त वेतनधारक आहेत किंवा ज्यांच्या वार्षिक उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे, अशा नागरिकांनी स्वतःहून "अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा" या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही आणि त्यामुळे त्यांचा धान्याचा लाभ बंद झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील. त्यामुळे तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदारांनी केलय.










