
सावंतवाडी : निरवडे येथील श्री देव दोन पूर्वस ते धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतने ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी बसवलेले सौर पथदिवे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निरवडेचे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सावंतवाडी पोलिसांकडे केली आहे. पेडणेकर यांनी या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
निरवडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुमारे दोन महिन्यांपूर्वीच ग्रामस्थांना रात्री-अपरात्री रस्त्याने ये-जा करताना सोयीचे व्हावे आणि सुरक्षितता मिळावी या उदात्त हेतूने हे सौर दिवे बसविण्यात आले होते. मात्र, या चोरट्यांनी केवळ दिवे चोरले नाहीत, तर सौर दिव्याच्या खांबाखाली आग लावली आणि त्यानंतर तो खांब वाकवून वरील सौर दिवा चोरून नेला आहे. या चोरीची माहिती मिळताच उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी थेट सावंतवाडी पोलीस ठाण्यात जात चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना योग्य कारवाई करा, अशी मागणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी या प्रकरणी संबंधितांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या घटनेचा सखोल तपास करून चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.











