
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच भुमिपूजन २७ जून २०१५ ला झाले असून तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आदी तत्कालीन सत्ताधारी उपस्थित होते. शासनान यासाठी लाखो रूपये खर्च केला. पहिली कुदळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली होती. १२ ऑगस्ट २०१६ ला राष्ट्रपतींनी याला मान्यता दिल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांनी देत कोकण रेल्वेच्या सीएमडींना एवढे पुरावे पुरेसे होतील असा टोला हाणला. तसेच सचिव मिहीर मठकर यांनी हे टर्मिनस आहे की नाही हे एकदाच जाहीर करून टाकावे असे आव्हान सीएमडींना दिले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे, महेश परूळेकर आदी उपस्थित होते. ॲड. निंबाळकर म्हणाले, कोकण रेल्वेचे सीएमडी संतोषकुमार झा यांच विधान म्हणजे राष्ट्रपतींनी दिलेल्या मान्यतेचा अनादर आहे. 'टर्मिनस'साठी पुरावे मागून अधिकारी प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाची प्रवाशांसाठी असलेली अनास्था यातून स्पष्ट होते. टर्मीनससाठी आग्रही असणारे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी याची दखल घ्यावी असे त्यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात बंद झालेल्या गाड्या अद्यापही पूर्ववत झालेल्या नाहीत. निवडणुका आल्या की केवळ घोषणा केसरकर करतात. त्यांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज्यशासन वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी आग्रही असून त्यासाठीची घोषणा झाली आहे. यासाठी सरकारचे आम्ही आभार मानतो. याप्रमाणे त्यांनी ५० टक्के काम करून अर्धवट राहीलेले रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणावे अशी मागणी ॲड. निंबाळकर केली.
दरम्यान, सीएमडी कार्यक्रमासाठी सावंतवाडीत आले असता त्यांना आम्ही भेटलो. टर्मीनस बाबत त्यांनी विचारलेला प्रश्न चुकीचा आहे. अनेक बैठका यापूर्वीही झालेल्या आहेत. आंदोलन, उपोषणही केलीत. मात्र, कोकण रेल्वे महामंडळाला प्रवाशांची चिंता नाही. यामुळे कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी अस मत सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच सीएमडी श्री. झा यांनी हे टर्मीनस आहे की नाही ? याची घोषणा करून दुध का दुध अन् पानी का पानी करून टाकावं असे आव्हान दिले.











