भाला फेक स्पर्धेदरम्यान विद्यार्थी गंभीर जखमी

Edited by: लवू परब
Published on: December 16, 2025 19:53 PM
views 25  views

दोडामार्ग : कोनाळकट्टा येथील एका विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असताना भाला फेक स्पर्धेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. आदिराज रामदास नाईक (१२) असे विद्यार्थ्याचे नाव असून या विद्यार्थ्याला भाला डोक्यात लागून गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील संपूर्ण शिक्षण समूहात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील कोनाळकट्टा येथील एका प्रशालेत शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या स्पर्धेत भाला फेक खेळ सुरू झाला. यावेळी अभिराज नाईक यांच्या डोक्यात भाला घुसला. त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी बांबोळी गोवा येथे हलवण्यात आले. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो लवकरच डिस्चार्ज होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या अपघाताने शाळा व परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी विद्यार्थ्याच्या आईवडीलांसह शिक्षकही त्याच्याजवळ असून सतत विचारपूस करत आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनीही बांबोळी येथे जाऊन जाबजबाब घेतले.