सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासनासाठी साथ द्या !

अन्नपूर्णा कोरगावकर यांचे आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: December 01, 2025 17:47 PM
views 13  views

सावंतवाडी : माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार प्रचार करत मतदारांना भावनिक साद घातली आहे. सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सर्वोत्तम सेवा देण्याच्या दृढ निश्चयाने आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सौ. कोरगावकर यांनी आपल्या आवाहनात सावंतवाडीच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही टप्प्यांशी आपला भावनिक व जिव्हाळ्याचा संबंध असल्याचे सांगितले.

अनेक वर्षांच्या सार्वजनिक कार्यातून त्यांना नागरिकांच्या अपेक्षा, अडचणी आणि आशा जवळून समजल्या आहेत. या अनुभवातूनच सुजाण, जबाबदार आणि लोकाभिमुख नगरपरिषद उभी करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. महिलांचे सक्षमीकरण, उत्कृष्ट पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणपूरक नियोजन. प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा पोहोचवणारे उत्तरदायी स्थानिक स्वराज्य व्यवस्थापन." आपल्या विश्वासाने आजवर ज्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्या पुढे आणखी काटेकोरपणे आणि निष्ठेने निभावण्याची तयारी मी दाखवते," असे सांगत, धनशक्तीपेक्षा जनतेचा सहकार्यपूर्ण प्रतिसाद आणि विधायक सूचना आपल्यासाठी अधिक महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. 'जनतेची मला साथ' असे म्हणत नगराध्यक्षपदासाठीच्या अपक्ष उमेदवार सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात जोरदार प्रचार करत आघाडी घेतली आहे. संपूर्ण शहर पिंजून काढत त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. त्याचबरोबर, त्यांनी पक्षांच्या तोडीस तोड असा डिजीटल आणि हायटेक प्रचार देखील प्रभावीपणे केला आहे.