
दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाजवळ मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र, यावर अद्याप ना नगरपंचायत, ना वनविभागाने कारवाई केली. कारवाईबाबत नगरपंचायत मुख्याधिकारी व वनक्षेत्रपाल यांना विचारले असता त्यांनी एकमेकांकडे बोट दाखविले. त्यामुळे त्या अवैध वृक्षतोडीवर कारवाई करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? हा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाजवळ नगरपंचायत क्षेत्रात एका व्यक्तीने बेसुमार प्रमाणात मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली आहे. कत्तल करून झाडे तशीच ठेवून संबंधित व्यक्तीने पोबारा केला. ही वृक्षतोड महिनाभरापूर्वी झाल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगू लागली. असे असतानाही वृक्षतोड झाली असल्याची माहिती वनविभागाला रविवारी समजली आणि सोमवारी नगरपंचायतचे वृक्ष अधिकारी अभिषेक नेमाणे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा हे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. यावेळी त्यांनी तोड झालेल्या सर्व वृक्षांचे छायाचित्र घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची कार्यवाही सुरू होती. मात्र तब्बल महिन्याभरापूर्वी वृक्षतोड झालेल्या घटनेवर नगरपंचायतने उशिरा केलेल्या कारवाईबाबत शहरात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या.
वनविभागाला पत्र व्यवहार करणार : मुख्याधिकारी
या वृक्षतोडीबाबत नगरपंचायत विभागाने काय कारवाई केली? असा सवाल मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांना विचारला असता कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षतोड झालेले क्षेत्र किती? असे विचारले असता आपण पुन्हा अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षतोडीवर कारवाई करण्यास विलंब का? तसेच अधिकारी व संबंधित वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीमध्ये काही आर्थिक साटेलोटे झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे याबाबत आपण काय सांगाल असे मुख्याधिकारी गायकवाड यांना विचारले असता प्रशासनाला माहिती रविवारी मिळाली व लागलीच सोमवारी कारवाई केली. शिवाय वृक्षतोड करणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करणार असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. एकूण लाकूड साठा किती आहे? याबाबत विचारले असता वनविभागाशी याबाबत पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची : वनक्षेत्रपाल
नगरपंचायत क्षेत्रात झालेल्या वृक्षतोडीवर वनविभागाला कारवाईचे कोणते अधिकार आहेत? असे प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नगरपंचायत क्षेत्रातील वृक्षतोडीवर कारवाई करण्याचे अधिकार हे पूर्णतः नगरपंचायत प्रशासनाला आहे. वनविभाग केवळ वाहतुकीसाठी परवाना देऊ शकतो. मात्र नगरपंचायत क्षेत्रात वृक्षतोड झाली तर त्यात कोणताही हस्तक्षेप करण्याचा कायदेशीर अधिकार वनविभागाला नाही. नगरपंचायत प्रशासन कारवाई करण्यासाठी वनविभागास पत्रव्यवहार करणार आहे. त्यावेळी तुमची कोणती भूमिका राहील? असा सवाल विचारला असता कायदेशीर दृष्ट्या व नगरपंचायत कायद्याप्रमाणे वनविभागाला कोणतीही कार्यवाही करण्याचा अधिकार नाही. उलट सर्व कारवाई ही नगरपंचायत प्रशासनानेच करायची असते असे श्री. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.










