
सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी वेंगुर्ला व मालवण या नगरपरिषदा व कणकवली नगरपंचायतीचे ४ नगराध्यक्ष व ७७ नगरसेवक पदांसाठी उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये मतदान होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी १८ उमेदवार व ७७ नगरसेवक पदासाठी २७१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद होत आहे. मतमोजणी बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी होत आहे. कुडाळ तालुक्यात एका व्यक्तीची हद्दपारी व मालवण मध्ये वीस लाख रुपये रोकड सापडल्याची घटना वगळता कोणत्याही तक्रारी नाहीत. सर्वच्या सर्व ७४ मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा सुरू राहणार आहे अशी माहिती सोमवारी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे व जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या चारही नगरपंचायत नगरपरिषद क्षेत्रात ७४ मतदान केंद्र असून या ठिकाणी ६०० पोलीस कर्मचारी अधिकारी यांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५५० व्यक्तीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अकरा व्यक्तींकडे असलेले शस्त्र वगळता अन्य सर्व शस्त्रे पोलिसांनी जमा करून घेतली आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासन व पोलिसांनी दक्षता घेतली आहे. चारही ठिकाणी आपण भेटी दिल्या असून पोलीस संचलन केले आहे. विशेष दंडाधिकारी म्हणून प्रत्येक भागात विशेष नियुक्ती देण्यात आली आहे. असेही जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावेळी बोलताना सांगितले.
सावंतवाडी वेंगुर्ला व कणकवली या भागाची मतमोजणी त्या त्या भागातील तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी तर मालवण नगर परिषदेची मतमोजणी नगरपरिषदेच्या ठिकाणी होणार आहे. शक्यतो या क्षेत्रातील मतदान असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या मतदान कामकाजातून वगळण्यात आले असून बाहेरचे कर्मचारी अधिकारी घेण्यात आले आहेत. त्यामुळे पोस्टल मतदान शक्यतो होणार नाही. त्यामुळे मतमोजणी ही गतीने होईल अशी अपेक्षा आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला नगरपरिषद अधिकारी विनायक औंधकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.










