
मालवण : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या रोख रक्कम मिळाल्याचे स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यातील करारी बाणा यानिमित्ताने आपल्यात पाहायला मिळाला अशी कौतुकाची थाप मारली आहे.
धंगेकर यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्गातील नगरपरिषदांच्या निवडणुकीत सुरू असलेल्या पैशाच्या बाजारावर आपण आवाज उठविला. आमचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे याच्या मधला करारी बाणा हा या निमित्ताने आपल्यात पाहिला मिळाला. एका बाजूला निवडणूक यंत्रणा हायजॅक होत असताना यावर आवाज उठविण्यासाठी वाघाचे काळीज असाव लागत आणि ते आपल्यामध्ये असल्याचे या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिले आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्याची नोंद इतिहास ठेवत असतो. निलेश तुम्ही लढताय, एकनाथ शिंदे साहेबांचे सैनिक म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. नारायण राणे साहेबांनी सुद्धा त्यांच्या जीवनात प्रचंड संघर्ष केलेला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपण ही संघर्ष करीत आहात. तुमच्या संघर्षाच्या बाजूने कोकणातील जनता उभी राहिल्याशिवाय राहणार नाही.










