
सावंतवाडी : संविधानाने आपल्याला काही हक्क आणि अधिकार दिले आहेत. त्याचबरोबर काही कर्तव्यही सांगितलेली आहेत. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण आपल्या अभिव्यक्तीने आपला देश संकटात सापडणार नाही अथवा कोणत्याही व्यक्तीचा अपमान होणार नाही. कोणाच्याही भावनांना ठेच पोचणार नाही. देशाच्या सार्वभौमत्वावर गदा येणार नाही. देशाच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही. या गोष्टींकडे लक्ष देणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज विधि महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अॅड. श्रीशा योगीश कुलकर्णी यांनी केले.
अॅड. श्रीशा कुलकर्णी या शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडे संचलित तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या ७६ व्या स्वीकृती दिनानिमित्त आयोजित ‘आपले संविधान आपला अभिमान’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमात व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या. त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई पर्यवेक्षक दयानंद बांगर ज्येष्ठ शिक्षक प्रसाद आडेलकर, किशोर नांदिवडेकर, शिक्षिका सौ मिलन देसाई पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री.प्रभाकर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री देसाई व अॅड. कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री बांगर, श्री आडेलकर, सौ देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने व श्रीदेवी सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे व प्रास्ताविकेचे पूजन करण्यात आले.
अॅड. कुलकर्णी पुढे म्हणाल्या आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा स्वःताचा एक सर्वोच्च कायदा असावा. यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत अनेक विचारवंत होते. त्यांनी काळाची गरज ओळखून कच्चा मसुदा तयार केला. अन्य देशांच्या राज्य घटनांचा अभ्यास केला आणि आपली राज्यघटना तयार केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील राज्यघटना वाचणे ही एक पर्वणी आहे. त्यात अनेक चित्रे आहेत. माणसाने सतत काम करावे अन् स्वतःचा आणि देशाचा विकास करावा यासाठीच राज्यघटना आहे. आपल्या राज्यघटनेत ३९५ मुद्दे, २२ भाग व ८ परिशिष्टे , सुमारे दोन लाख शब्द आहेत. आपले संविधान जगातील सगळ्यात मोठे संविधान आहे. त्यात मुलभूत हक्क, अधिकार आणि कर्तव्ये आहेत. संविधानाने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. आपल्यासाठी पोषण आहार योजना सुरू केली.
अॅड. कुलकर्णी पुढे म्हणाल्या धर्म, अस्पृश्य या शब्दाची व्याख्या संविधानाने कोठेच केलेली नाही. संविधानाने स्वतःला घातक असलेल्या गोष्टी आधिच बाजूला केलेल्या आहेत. नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे या उद्देशाने १०६ वेळा घटनेत बदल करण्यात आला. कोणत्याही समस्येचे उत्तर आपल्याला राज्यघटनेत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे. अठरा वर्षाचे झालात की परवाना काढावा. परवान्याशिवाय गाड्या चालवू नये. मतदान अधिकार बजावावा. योग्य उमेदवाराला मतदान करावे. आमिषांना, प्रलोभनांना बळी पडू नये. खाऊचे कागद , कचरा. यांची योग्य विल्हेवाट लावणे हे आपले कर्तव्य आहे. राष्ट्रीय प्रतिकांचा आदर करा. आपले संविधान महान आहे. असेच काही नाही जे संविधानात राहून गेले आहे. असे अॅड कुलकर्णी म्हणाल्या.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री देसाई म्हणाले आपल्या रोजच्या जगण्याशी आपल्या संविधानाचा संबंध असतो. संविधानाचा सर्वांनीच मान राखायला हवा.अशा व्याख्यानातून आपल्या मनावर चांगले संस्कार घडतात. विद्यार्थ्यांनी हे चांगले संस्कार आत्मसात करून देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे. यावेळी प्रसाद आडेलकर यांनी प्रास्ताविकेचे वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन दयानंद बांगर यांनी केले. परिचय किशोर नांदिवडेकर यांनी करून दिला.
व्याख्यानापूर्वी सकाळी जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला श्री जनता विद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ झाला. तळवडे गेट - बाजारपेठ या मार्गे पुन्हा विद्यालयाच्या मैदानात येऊन फेरीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘भारत आमची माऊली, संविधान त्याची सावली’. ‘कर्तव्य हक्काचे भान, मिळवून देते संविधान’. ‘संविधान एक परिभाषा है, मानवताकी आशा है’. अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. या फेरीत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या जनजागृती फेरीचे नेतृत्व मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी केले










