
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून नामनिर्देशन पत्र ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. तर ३० नोव्हेंबर रोजी जाहीर प्रचार संपणार आहे. मतमोजणी तहसीलदार कार्यालयात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
या निवडणुकीत सर्वसाधारण उमेदवारासाठी १ हजार तर अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ५०० रुपये नामदर्शन पत्रासोबत डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे. तहसीलदार श्रीधर पाटील निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांच्या उपस्थितीत आज राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक आचारसंहिता आणि घ्याव्या लागणाऱ्या परवानग्यांबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी संतोष जिरगे आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी माहिती दिली. नगरपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार असून उमेदवारी फॉर्म भरण्याची १० ते १७ नोव्हेंबर ही आहे. वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रावर मतदान करावे लागेल. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत ८५ वर्ष वयोगटातील मतदारांच्या निवासस्थानी मतदान झाले होते तसे होणार नाही, तर मतदान केंद्रावर मतदान करावे लागेल असे त्यांनी सांगितले. निवडणुकीचा प्रचार ३० नोव्हेंबर ला संपणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकीसाठी बॅनर, पोस्टर्स ,सभा घेण्यासाठी परवानगी घ्याव्या लागणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरावे लागेल. तर ऑफलाइन पद्धतीने ते सादर करायचे आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याने निवडणूक चिन्ह वापरणारे बॅनर लावता येणार नाही. यात्रा मध्ये सहभागी होण्यास बंदी नाही. मात्र मतदारांना आव्हान करता येणार नाही किंवा आमिष देता येणार नाही धार्मिक जागांच्या ठिकाणी प्रचार सभा घेता येणार नाही. उमेदवारांना निवडणूक प्रतिनिधी त्याच प्रभागातील द्यावे लागतील. जाहीर प्रचार सभा घेणाऱ्या पक्षांना ४८ तास अगोदर परवानगी मागावी लागणार असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम परवानगी असेल असे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ साक्षी वंजारी, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश गवंडळकर,शहर संघटक निशांत तोरसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमाकांत वारंग, समिर वंजारी, दिपाली भालेकर व अधिकारी उपस्थित होते.










