सावंतवाडी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात महत्वाची बातमी

Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2025 20:05 PM
views 25  views

सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात सावंतवाडी शहरातच शासनाने 2019 मध्ये  जागा आरक्षित केली आहे. मात्र, तरीही मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटलचे काम सुरु नाही. शासनाचेच आरक्षण असून पुढील कार्यवाही झाली नसल्याचे अभिनव फाऊंडेश सिंधुदुर्गचे वकील ॲड. महेश राऊळ यांनी आज न्यायमूर्तीच्या निदर्शनास आणले. यासंदर्भात आठवडा भरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गला दिले. 

शासन निर्णय 2018 मध्ये होऊनही अद्याप कार्यवाही का झाली नाही ? याची विचारणा करुन न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश शासनास दिले होते. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे प्रशासन अधिकारी डॉ. अमित आवळे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सरकारी वकील सिध्देश्वर कायल, विधी अधिकारी ॲड.डी.डी.धुरी न्यायालयात हजर होते.

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाच्या जागेतच मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल प्रस्तावित आहे. मात्र, या जागे संदर्भातील एक अपिल उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने उप जिल्हा रुग्णालयाच्या जागेत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम सुरु करता येत नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. यावर प्रतिवाद करतांना अभिनव फाऊंडेशनचे वकील महेश राऊळ म्हणाले, शासनाच्या नगररचना विभागाने 28 आँगस्ट 2019 मध्ये नोटिफिकेशन काढून मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटलसाठी जागा शहरात आरक्षित केली आहे. 2018 मध्ये मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटलसंदर्भात शासन आदेश निघाले. त्यानंतर सावंतवाडी शहरात ही सुविधा व्हावी म्हणून शासनाने शहरातील महत्त्वाची जागा आरक्षित केली. यासंदर्भात जागा आरक्षित केल्याचे  28 आँगस्ट 2019ला नोटिफिकेशन आहे. याबाबत नकाश तयार आहेत, असे सांगून ॲड.राऊळ यांनी न्यायालयात आरक्षित जागेचा नकाशाच सादर केला. त्यावर सविस्तर प्रतिज्ञापत्रा व्दारे अभिनव फाऊंडेशनने म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वकिल राऊळ म्हणाले, शासनानेच सावंतवाडी शहरात मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटल साठी जागा आरक्षित केली असतांना जागेची अडचण येण्याचे कारणच नाही. जागा उपलब्ध आहे. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करु. याबाबत न्यायालयाने पुढील सुनावणी 11 डिसेंबर 2025ला रोजी निश्चित केली आहे.