प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज पुण्यतिथी उत्साहात

विविध कार्यक्रमांचे आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: November 02, 2025 19:36 PM
views 31  views

सावंतवाडी : ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या १२ व्या पुण्यतिथी उत्सवा रविवारी  उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी महाराजांच्या शिष्य व भक्तांनी त्यांचे दर्शन घेत महाराजांच्या कृपाशीर्वाद घेतला. यानिमित्त समाधी मंदिरात विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

प. पू. प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज माणगाव येथील निवासी प पू परिवज्रकाचार्य श्री परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांच्या थोर गुरुपरंपरेतील वैद्यराज परमपूज्य बाबा महाराज मानवतकर महाराज यांचे पट्ट शिष्य होते. कुडाळकर महाराज यांच्या पुणे गोखलेनगर येथील श्री दत्त सदनाय गेल्या ५८ वर्षांपासून  श्री गुरुचरित्र अखंड पारायण सप्ताह, श्री दत्त जयंती, श्री दत्त याग, गुरुपौर्णिमा आदी कार्यक्रम अखंडपणे सुरू आहेत. गुरुकृपेने त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रोगी बरे करताना असंख्य लोकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबांचे कल्याण केले. त्यांचे देशभरासह जर्मनी, अमेरिका, युरोप, मॉरीशिअस आदी परदेशात हजारो प्रचंड शिष्यवर्ग आहे.  यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती त्यानंतर सकाळी सर्व देवतांचे पूजन झाल्यानंतर प पू प्रेमानंद स्वामी महाराजांच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर पिंपरी संत तुकारामनगर येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाचे ह. भ. प. अशोक महाराज गुरव, आणि गोरक्षनाथ महाराज टाव्हरे, ह. भ. प. चंद्रकांत महाराज घोडे यांनी सादर केलेल्या सुश्राव्य वारकरी सांप्रदायी भजनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. दुपारी महाआरती आटोपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. 

 सायंकाळी वारकरी सांप्रदायिक हरीपाठ त्यानंतर आरती झाली. यावेळी पुणे मंचर येथील ह. भ. प. टाव्हरे महाराज  यांच्या वारकरी सांप्रदायिक कीर्तनाने भाविकांना मोहिनी घातली. पिंपरी पुणे येथील श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळाच्या उत्कृष्ट संगीत साथीमुळे या कीर्तनाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. यावेळी पुणे परिसरातील महाराजांचे भक्त उदय महाजन, श्रीकांत ढोले, अजित बनकर,, राजेंद्र मिसार, एकनाथ भुजबळ,अजित बनकर, बाळा साहेब दरेकर, किसन कोंडे, अरुण तळवडेकर, बाळा कर्पे, सुरेश वरेकर आदी उपस्थित होते. पुण्यतिथी सोहळ्याला आलेल्या भाविकांचे परमपूज्य प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रवींद्र कुडाळकर, अँड सुरेंद्र मळगावकर यांनी स्वागत केले.