तथ्य शोधक समितीचा अहवाल उद्या कोर्टात

अहवाल सिंधुदुर्गच्या वैद्यकीय क्षेत्राला कलाटणी देणार..? | गोवा बांबोळी वारी बंद होणार..?
Edited by: विनायक गांवस
Published on: October 16, 2025 18:15 PM
views 87  views

सावंतवाडी : उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची तथ्य शोधक समिती उद्या सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाच्या सद्यस्थितीवर आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल सिंधुदुर्गच्या वैद्यकीय क्षेत्राला कलाटणी देणारा ठरू शकतो, त्यामुळे सर्व सिंधुदुर्गवासियांचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे.

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मीला देशमुख यांनी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या जनहित याचिकेची दखल घेऊन ही महत्त्वपूर्ण समिती गठीत केली होती. यात तटस्थपणे महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन सदस्य अँड. संग्राम देसाई होते. तसेच आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक (कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग) या चार लोकांच्या समितीने ८ ऑक्टोबरला सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे

ट्रॉमा केअर युनिटची स्थिती, आय.सी.यू. आणि रक्तपेढीतील रिक्त पदे, उपचाराअभावी बांबुळी (गोवा) आणि कोल्हापूर येथे पाठवाव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या यावर हा अहवाल असणार आहे‌

अँड. संग्राम देसाई यांनी माध्यमांना सांगितले होते की, येथील वस्तुस्थिती कोणतीही लपवली न जाता न्यायालयाला कळवली जाईल. त्यामुळे हा अहवाल आणि त्यानंतर न्यायमूर्तींचे दिशा निर्देश सिंधुदुर्गातील आरोग्यसेवेत मोठे परिवर्तन घडवणार का ? तसेच रुग्णांना उपचारासाठी गोवा बांबोळी वारी बंद होणार आहे. हे ठरवणार आहे. वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल.