
सावंतवाडी : मळेवाड मार्गे सावंतवाडी अशी गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत टोयोटा फॉर्च्युनर कारसह गोवा बनावटीची दारू मिळून सुमारे ३३ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज सकाळी साडेसात वाजता न्हावेली येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी केसाराम बेचाराम देवासी, रा. अगरवाडा, गोवा, हडमतसिंग वचनसिंग चौहान, रा. मांद्रे, गोवा, ईश्वर सिग, रा. मांद्रे, गोवा (सर्व मूळ रा. जल्लोर, राजस्थान) या तिघांना ताब्यात घेतले. तिघेही आपल्या ताब्यातील फॉर्च्युनर कारमधून गोवा बनावटीची दारु वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ३० लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार आणि ३ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू समाविष्ट आहे. एकूण ३३ लाख ९३ हजार ६००/- रू. किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ .मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक, नयोमी साटम, यांच्या निर्देशानुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, आशिष जामदार, आणि पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांनी केली.










