इन्सुलीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2025 17:41 PM
views 110  views

सावंतवाडी : भिमगर्जना युवक मंडळ, इन्सुली रमाईनगर व त्रिरत्न बौध्द महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इन्सुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी विचार मंचावरील मंडळाचे सचिव अरविंद जाधव,त्रिरत्न संघाचे धम्मचारी जिनचित्त,लोकदर्शी,तेजबोधि,सुचिविर, धम्मचारिणी यशोमती, प्राथमिक शिक्षक असणकर इत्यादिंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून तसेच सामुदायिक बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.जिनचित्त यांनी आपल्या प्रवचनात धम्म दिक्षेचे महत्व विशद करताना बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञ्यांचा अर्थ स्पष्ट करून बौद्ध लोकांनी त्याचे काटेकोर पालन केल्यास बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतला नवसमाज निर्माण होऊन धम्म राज्य अस्तित्वात येऊ शकते, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला विशेष करून उत्तम कदम, श्रध्दा असणकर, राघोबा जाधव, राहुल जाधव, दिपक जाधव, भिमगर्जना मंडळाचे सदस्य, पदाधिकारी तसेच रमाई नगरातील सर्व महिला, पुरुष व विद्यार्थी युवक-युवती आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी लोकदर्शी यांनी तर आभार प्रदर्शन सिध्देश जाधव यांनी केले.