जल्लोषी वातावरणात नवदुर्गांचं विसर्जन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2025 16:51 PM
views 174  views

सावंतवाडी : नवरात्रोत्सवाचा समारोपाला सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील नवदुर्गांचे विसर्जन मोठ्या जल्लोषी वातावरणात पार पडले. यानिमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका भाविकांसाठी खास आकर्षण ठरल्या. या क्षणाचे साक्षीदार होत या विसर्जन मिरवणूकांत आबालवृद्ध सहभागी झाले होते. 

या विसर्जन मिरवणुकांमधील देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भवानी माता, साईबाबा, गणपती यांचे हालते देखावे तसेच विविध पौराणिक देखावे लक्षवेधी ठरले. मिरवणुकीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक कलाविष्कारांनी रंग भरला होता. ढोलपथकांचा गगनभेदी आवाज, पारंपरिक फुगडी, तसेच गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी पाऊले विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. रात्री उशिरा शहरातील महत्त्वाच्या नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्या नवदुर्गांना मोती तलावात निरोप दिला.

यात सावंतवाडी बाजारपेठ, माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळ, ओंकार नवरात्रोत्सव मंडळ भटवाडी आणि रासाई नवरात्रोत्सव मंडळ जिमाखाना येथील नवदुर्गांचे विसर्जन करण्यात आले. शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये देखील विसर्जन मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. सर्वत्र मोठ्या उत्साहाने नवदुर्गांना निरोप देण्यात आला. देवीला निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले होते.