
सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्यावर टीका होत असल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी सांगत टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केसरकरांवर टीका करणाऱ्या विरोधकांना ''दिपक केसरकर हे गणित तुमच्यासारख्यांच्या सात पिढ्यांना सोडवता येणार नाही, असा टोला हाणला आहे.
ते म्हणाले, अनेक महिन्यांच्या शांततेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा दीपक केसरकर यांच्यावर विनाकारण तिखट टीका सुरू झाली आहे. केसरकरांचे निकटवर्तीय असलेले लोक आता त्यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. तुम्ही कितीही टीका केलीत तरी जनतेने सलग चौथ्यावेळी दिपक केसरकरांवरील प्रेम दाखवून दिलं आहे. आजही केसरकर लोकांच्या सुख दुःखात खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्या डोक्यावर लोकांच्या प्रेमाची सावली आहे. त्यामुळे आग ओकणारे टीकाकार आले म्हणून त्यांना फरक पडत नाही. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या आणि केवळ प्रसिद्धीसाठी टीका करणाऱ्यांनी याच भान ठेवावं. दिपक केसरकर यांनी राज्याचे यशस्वी शिक्षणमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली आहे. त्यांच्यावर आजपर्यंत कोणताही आरोप नाही, ते स्वच्छ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी रेकॉर्ड ब्रेक निधी आणूनही कधी त्याची प्रसिद्धी केली नाही, ज्याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यामुळे जेवढं झेपेल तेवढंच बोला. दीपक केसरकर कधीच कोणाबद्दल बोलत नाहीत आणि आम्हीही बोलत नाही. पण त्यांच्यावर प्रेम असलेले असंख्य तरुण आहेत. जर कोणी पुन्हा पुन्हा उगीच बोलत असेल, तर जशास तसं उत्तर मिळेल आणि ते पण शिवसेना पद्धतीने मिळेल. शिवसेना ही आग आहे, जर या आगीचं वणव्यात रूपांतर झालं, तर सगळंच भस्मसात होईल आणि लपून बसायलाही जागा मिळणार नाही. त्यामुळे सरळ भाषेत सांगायचं तर मर्यादेत राहा, मर्यादा सांभाळून बोला,असा स्पष्ट इशारा युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी दिला आहे.










