
सावंतवाडी : जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांसाठी देवदूत ठरणारी १०८ रुग्णवाहिका सेवा नागरिकांसाठी एक मोठा आधार बनली आहे. सेवा सुरू झाल्यापासून ते ऑगस्ट २०२५ पर्यंत, या सेवेने तब्बल १ लाख ६३ हजार ६२७ रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवून त्यांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, १०८ रुग्णवाहिका सेवेने विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत धाव घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक १,१०,८३१ रुग्णांना सामान्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यात आली. यासोबतच, ८,९०७ गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर ७,००४ अपघातग्रस्त रुग्णांना जीवनदान मिळाले. हृदयविकाराचा झटका आलेल्या २,३७४ रुग्णांनाही या सेवेमुळे वेळेवर उपचार मिळू शकले.
रुग्णवाहिकेत २४४ बालकांचा जन्म !
या सेवेचे सर्वात मोठे यश म्हणजे रुग्णवाहिकेतच तब्बल २४४ बालकांचा सुखरूप जन्म झाला. अत्यंत नाजूक परिस्थितीत रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रसूती करून माता आणि बालकांचे प्राण वाचवले. याशिवाय, १३१ गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटरची सुविधा देऊन त्यांचे प्राण वाचवण्यात आले.
या यशस्वी कामगिरीबद्दल बोलताना जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यानी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आमची १०८ रुग्णवाहिका सेवा ही केवळ एक नोकरी नसून ती एक जबाबदारी आणि जनतेची सेवा आहे. प्रत्येक रुग्णाचा जीव आमच्यासाठी मोलाचा आहे. आमच्या टीममधील डॉक्टर, चालक आणि वैद्यकीय कर्मचारी २४ तास अथक परिश्रम घेत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आपत्कालीन परिस्थितीत सर्वोत्तम आणि जलद वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. लोकांचे प्राण वाचवण्याचे समाधान हेच आमचे सर्वात मोठे बक्षीस आहे." एकंदरीत, १०८ रुग्णवाहिका सेवेने जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य सेवेचा कणा बनून हजारो कुटुंबांना आधार दिला आहे.










