
सावंतवाडी : कोलगाव आयटीआयच्या ठिकाणी पडलेलं भगदाड अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविण्यात आले. प्रवाशी, स्थानिकांच्या जीवीतास यामुळे धोका निर्माण झाला होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून याची दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. अखेर आज हे भगदाड बुजवत रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.
प्रवाशी, स्थानिकांना या भगदाडाचा नाहक त्रास होत होता. यामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने लोकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला होता. याबाबत कोकणसादने वृत्त प्रसारित केल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाकडून त्याची दखल घेत तात्काळ कार्यवाहीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यानंतर आज ही दोन्ही भगदाड तात्काळ बुजवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांसह प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.










