
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात ऐन गणेशोत्सवात मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. उत्सवासाठी शहरात येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिकांना या खड्ड्यांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच ही परिस्थिती असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
ऐन गणेशोत्सव काळात शहरात भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक चाकरमानी गावी आलेत. परंतु, शहराच्या मुख्य रस्त्यांवरच खड्डे पडल्याने नाहक त्रास होत आहे. लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. पावसाच पाणी साचून चिखल उडत असल्याने या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी या समस्येबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराने बनवलेले रस्ते वर्षभरही टिकत नाहीत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरात वारंवार ही परिस्थिती उद्भवते अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात प्रशासनाकडून निष्काळजीपणाची होत आहे. त्यामुळे, तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .