
सावंतवाडी : सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांना विम्याची रक्कम न देण्याबाबत विमा कंपनीने केलेल अपील कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी फेटाळून लावले. त्यामुळे गेले तीन वर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश आले आहे. यामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळणार आहे, अशी माहिती अण्णा केसरकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याबाबतची बैठक नुकतीच मंत्रालयात आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील आंबा, काजू बागायतदार यांनी आपल्या बागायतींचा फळपीक विमा संबंधित कंपनीकडे भरणा केला होता. सन २०२२-२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसात तिन्ही तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, तांत्रिकबाबी लक्षात घेता संबंधित विमा कंपनीने शेतकरी बागायतदारांच्या नुकसानीची विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली नव्हती. या संदर्भात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. केसरकर यांनी कृषी विभागाकडे तसेच जिल्हाधिकारी यांचाकडे दाद मागितली होती.
त्यानंतर संबंधित विमा कंपनी, कृषी खाते व जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन यामध्ये जिल्हाधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम दिली पाहिजे अशा सुचना केल्या होत्या. तरीसुद्धा संबंधित विमा कंपनीने रक्कम अदा केली नव्हती. विमा कंपनीकडून याबाबत कृषी विभागाकडे अपील करत आपण शेतकऱ्यांना रक्कम अदा करू शकत नसल्याचे सांगितले होते. मात्र, कंपनीच्या या अपीलावर श्री. केसरकर यांनीही अपील करत संबंधित कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी देऊ शकते याबाबत म्हणणे मांडले होते. यानंतर या अपीलावर नुकतीच मंत्रालयात कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कोकण विभागाचे बालाजी ताठे यासोबतच आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत झालेल्या चर्चेत विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम कशी देऊ शकते हे श्री. केसरकर यांनी निदर्शनास आणून दिले. वीम्याचे पैसे भरूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय ? असे मुद्दे उपस्थित केले. तर तांत्रिक अडचण ही संबंधित विमा कंपनीचीच असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेत आम. केसरकर, आम. राणे यांनीही आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी उपस्थित केल्या. यानंतर कृषी प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळून लावत लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले, अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली. यासाठी शेतकरी संघटनेचे संजय राऊळ, कोचरा सरपंच योगेश तेली यांनी विशेष प्रयत्न केले.