
सावंतवाडी : गरीब, गरजू, शोषित आणि वंचित समाज घटकांना मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने नाग्या महादू येथील आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांच्या वसतिगृहास भेट देऊन सुमारे ६० हजार रुपयांच्या शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी वसतिगृहाचे संचालक उदय आईर आणि सौ. आईर यांनी मुलांसह सामूहिक प्रार्थनेद्वारे प्रतिष्ठानच्या सदस्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आणि वसतिगृहाला भेट देण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, मुलांना शिक्षण, तंत्रज्ञान, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले. भविष्यात मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपली संस्था कटिबद्ध राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या भेटीची संकल्पना मांडणारे संस्थेचे रवी जाधव यांनी मुलांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अरुण मेस्त्री यांनी वसतिगृह संचालक श्री. आईर यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांना ईश्वरी कार्य करत असल्याबद्दल धन्यवाद दिले.
यावेळी सावंतवाडी शहर आणि परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संस्थांनी दिलेल्या शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये श्री महालक्ष्मी सुपर बाजार यांच्याकडून ८३ मुलांना चपला, सुराणा ब्रदर्सकडून सर्व मुलांना रेनकोट, तर चेतन बेंगळ स्टोअर यांच्याकडून मुलांना शालेय वस्तू देण्यात आल्या. तसेच, मुलांसाठी खाऊ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी सावंतवाडी मोती तलाव कट्टा ज्येष्ठ नागरिक ग्रुप, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. देविदास बोर्डे, लीषा बांदेकर, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक दत्तप्रसाद गोठस्कर, सामाजिक कार्यकर्ते संजू शिरोडकर, नाईक फरसाण, माने गिफ्ट कॉर्नर महेश गोंधळेकर, कल्याण कदम, रवींद्र गगनग्रास, सचिन पिकुळकर आणि पंकज पेडणेकर यांनी सहकार्य केले.
या वस्तू जमवण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या रवी जाधव, रूपा गौंडर, शरदिनी बागवे आणि लक्ष्मण कदम यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
वसतिगृहाचे विद्यमान संचालक श्री.आईर यांनी आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या खडतर प्रवासाचा आणि या प्रवासात साथ देणाऱ्या मंडळींचा आवर्जून उल्लेख केला. मात्र, शासन स्तरावरून कोणतीच मदत मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, खजिनदार रवी जाधव, रूपा गौंडर (मुद्राळे), संचालिका शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम आणि ज्येष्ठ नागरिक अरुण मेस्त्री उपस्थित होते. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.