महिला सुरक्षेसाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ‘सेफ्टी ऑडिट’

Edited by: विनायक गांवस
Published on: June 30, 2025 10:43 AM
views 132  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि PRI-CBO कन्वर्जन्स प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा पडताळणी) आयोजित केले. महिलांना सुरक्षित प्रवासाचे वातावरण मिळावे या उद्देशाने सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत हे महत्त्वपूर्ण अभियान राबवण्यात आले.

या ‘सेफ्टी ऑडिट’मध्ये रेल्वे स्थानकावरील विविध पैलूंची बारकाईने तपासणी करण्यात आली. यात रिक्षाचालक, कामगार, प्रवासी, दुकानदार यांच्याशी संवाद साधण्यात आला. तसेच वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक मधुकर मातोंडकर यांच्याशी विशेष चर्चा करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भिंतीवरील सूचना फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, जनरल वेटिंग रूम, पिण्याच्या पाण्याची सोय आणि रेल्वे ट्रॅकवरील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी श्री सिद्धेश्वर ग्रामोदकर्ष मंडळ तळवडे (NGO) संस्थेचे संचालक नारायण परब, केरळच्या कुटुंबश्री मेंटर गिरीजा , DRP श्रावणी वेटे, BRP प्राची, LRP चैताली गावडे, परी ग्रामसंघ सचिव वैष्णवी, कोषाध्यक्ष रसिका पारकर, CRP बागकर आणि नव संजीवनी आरोही बांदिवडेकर, तसेच CRP राधिका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज अधोरेखित झाली असून भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले.