
सिंधुदुर्ग : राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने सुद्धा आता काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारिरीक आणि बौद्धीक क्षमतेचा विचार करता पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेचा आग्रह करणे अन्यायकारक वाटते. बालवयातील मुलांची मानसिकता लक्षात घेता, राज्यातील अनेक नामवंतांनी, शिक्षणतज्ञांनी जाहीरपणे इतक्या लहान वयात तिसऱ्या भाषेचे अध्ययन हे वर्तमान पिढीला झेपणारे नाही, हे स्पष्टपणे सांगितले आहे. सरकारने घेतलेल्या भाषा सक्तीच्या या निर्णयाला एकांगी मानून कोकण मराठी साहित्य परिषदेचा विरोध दर्शविला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर व कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.